एकटी
सुजित सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याने कंपनीच्या कामानिमित्त मुंबईला गेला होता. अजून फोन आला नाही म्हणून सुमनने मोबाईल घेतला. बघते तर काय... सुजितचा मेल. क्षणभर तिला प्रश्न पडला. सुजित ने मेल कसं काय केला? हा प्रश्न घेऊन तात्काळ तिनं मेल वाचायला सुरुवात केली-
प्रिय सुमन,
मी आज सकाळी मुंबईला पोहोचलो. प्रवासात मोबाईल हरवल्याने हा मेलचा उद्योग. आज दुपारी मीटिंग होईल आणि इथे किती दिवस मुक्काम ते ठरेल. 'कदाचित आठवडाभरही राहावे लागण्याची शक्यता आहे' असे बिरवेकर साहेब म्हणत होते.
सुमन सुरजकडे लक्ष ठेव. हल्ली तो सतत टी.व्ही. बघत असतो, मोबाईलवर गेम खेळत असतो. अभ्यास करताना दिसत नाही. माझ्या बिझी शेड्युलमुळे त्याच्याशी चर्चा करायला मला वेळ नसतो आणि तू कधी मला त्याच्या संदर्भात विचारतही नाही. आपला मुलगा आता दहा वर्षाचा झाला आहे. त्याच्या भवितव्याचाही आपण विचार केला पाहिजे. तुला राग येईल माझ्या बोलण्याचा पण तरीसुद्धा सांगतोय त्या पोराच्या आयुष्याचा विचार कर. किती दिवस झालं सांगेल म्हणतोय पण बिझी शेड्युल असल्यामुळे मला बोलायला वेळच नाही मिळायचा. आता जरासा मिळालाय म्हणून सांगतोय. तू तुझ्याच विचारविश्वात रममाण असतेस. तुला फॅन्टसीचं भारी वेड. मला माहित आहे तुझं वाचनावर प्रेम आहे. वाचायला तुला खूप आवडतं. पण अगं त्या छंदात किती वेळ राहायचं हेही ठरवता आलं पाहिजे. दिवस-रात्र माणसानं पुस्तकातच रमायचं का..? कधी तरी वास्तवात यावं की.कल्पनाविश्व हे कल्पना विश्वच की. मला पण छंद आहे की संगीत ऐकण्याचा. म्हणून काय मी माझा कामधंदा सोडून सारखं संगीत ऐकत बसायचं का..? परवा तर तुझी आवडती पुस्तकं स्टॉलवरून आणायला विसरलो तर काय तुझं ते रागावणं, रूसणं. नाही आवडलं मला. तुम्ही साहित्यप्रेमी माणसं ना अक्षरशः वेडी वाटता मला. सदैव कल्पनाविश्वात रमणारी. वेळेच भान नसलेली. खरं म्हणजे तुझं लहान मुलासारखे हट्ट करणं ही मला आवडत नाही. मी किती वेळा सांगितलय त्या टी.व्ही.वर, कम्प्युटरवर असणारी धूळ नाही आवडत मला. आणि हो, परवा तुला सांगितलं होतं ना बँकेमध्ये जाऊन चेक जमा करायला, नाही केलास. का कुणास ठाऊक? तुझं ना काय चाललय नेमकं काहीच कळत नाही मला. कंपनीच्या त्या फाईल्सची तुला करायला दिलेली वर्गवारी अजून तू करतेस आणि त्या कामवाल्या बाईच्या खाजगी आयुष्यात तुला डोकावण्याचा काय संबंध..? म्हणे, ती आपली सुख-दुःखे शेअर करते माझ्याशी. अगं, 'माणसानं कुठे 'प्रोफेशनल' आणि कुठे 'इमोशनल' वागायचं हे ठरवलं पाहिजे. तू सतत विचारमग्न असतेस. कसला विचार करते देव जाणे. तुम्हा बायकांना काय हवं असतं ना नाही कळत आम्हाला.
मला वाटतं, तू या गोष्टींचा नक्की विचार करशील आणि वास्तव जगात येशील अशी अपेक्षा करतो….
तुझाच,
सुजित
पत्र वाचून क्षणभर सुमनला काहीच सुचेना. आतल्या आत काहीतरी खदखदतयं. 'बऱ्याच दिवसांचं साचलेलं मोकळं व्हायचं म्हणतय' अशी भावना तिला दाटून आली. सुजितच्या मेलला रिप्लाय देण्यासाठी तिची बोटे कधीही किपॅडवर शब्द टाईप करायला लागली हे कळलंच नाही.
प्रिय सुजित,
तुझा मेल वाचून मला भावना शब्दबद्ध करण्याशिवाय गत्यंतर नव्हते म्हणून हा मेलद्वारे लेखन-प्रपंच. खरं तर समोरा-समोर बोलून शब्द हवेत विरून जातात त्यापेक्षा आपल्या भावना लिखित रुपात शब्दबद्ध केलेल्या बऱ्या. कारण त्या आपलं अस्तित्व जास्त काळ ठेवतील. सुजित, विवाह म्हणजे काय असते रे…? परंपरेने घालून दिलेली चौकट…? एकत्र राहणं..? यंत्रासारखे नुसतं काम करणं…? मूल जन्माला घालणं….? त्यांचं संगोपन करणं, शिकवून मोठं करणं आणि म्हातारपणी त्यांच्या आशेवर जगणं..? फक्त एवढेच काय? अरे या सगळ्या गोष्टी तर आहेतच पण याबरोबरच जिथं एकमेकांच्या भावनांना जाणणं आणि जपणं.., एकमेकांच्या सुख-दुःखात सामील होणं..., एकमेकांना भरभरून बोलणं..., एकमेकांची हृदय जपणं.. एकमेकांच्या उत्कट क्षणात रमणं बेधुंदपणे... एकमेकांकडे भरभरून पाहणे... एकमेकांच्या सहवासात उत्कटतेने जगणं.. यासुद्धा गोष्टींना जागा असावी की रे संसारात…
पण तू काहीही म्हण, हल्ली तुझं माझ्या बोलण्याकडे लक्ष नसतं व्यवस्थित. तू माझ्याकडे नीट बघतसुद्धा नाहीस. एवढी तुला घाई असते. आतवर जखम होते रे माझ्या. जरा आठव, आपण शून्यातून सगळं उभं केलंय आपण कुठून कुठपर्यंत आलोय. आपण आपल्या घरामध्ये सगळ्या वस्तू घेतल्यात. अगदी सुरुवातीला घरात टी.व्ही. सुद्धा नव्हता. लग्नानंतर पहिल्याच वर्षात आपण तो घेतला. पाठोपाठ फ्रीज, वॉशिंग मशीन,पंखा,कूलर अँड्रॉइड मोबाईल फोन इत्यादी. वस्तूनी घर भरलं. पण का कुणास ठाऊक.. या सगळ्यांमध्ये माझं मन रमत नाही रे.. खूप प्रयत्न केला रमवायचा. दिवसभर टी.व्ही., मोबाईल पाहून पण बघितले.पण नाही रमत माझं मन कशात. दिवसभर तू घरी नसतोस. तू तुझ्या कामात व्यस्त आणि मी घरी अस्वस्थ. मला वाटायचं, तुला माझी अस्वस्थता कळून येईल पण तुला काही कळायचं नाही. नंतर तर मी खूप अस्वस्थ व्हायचे. पण असू दे, तू सतत म्हणतोस ना, 'सवय होईल' पण नाही होत. खूप प्रयत्न केले. कारण माणूस नुसता हाडामांसाचा पुतळा नसतो. त्याला भाव-भावना असतात. काही अपेक्षा असतात. मी सदैव तुला म्हणते 'मला काहीतरी वेगळं हवंय तर तु म्हणायचास,'अगं, वेगळं म्हणजे तरी काय कसं समजायचं..? मग तर माझं काळीज चर्र करायचं. वाटायचं, तुला कशी माझी अस्वस्थता कळत नाही. पत्नीला काय हवं असतं रे पतीकडून..? प्रेम, आपलेपणा, जिव्हाळाच ना..? समजत नाही रे तुला कसं सांगावं. वाटतं तु मला समजून घ्यावं. जसा अगोदर होतास तसं व्हावं. जो हरवलाय कुठं समजत नाही मला …
मी नेहमी म्हणायचे, ज्या नवऱ्याला आपल्या बायकोची नि:शब्दता, मौन कळते ना तोच खरा. तर तू उत्तर सहजपणे द्यायचास, 'तुझ्या मनातलं मला काही कळत नाही, पुढे बोल' तू काहीही म्हण,पण अलीकडच्या काळात मी तुझ्या मधली स्थित्यंतरे पाहतेय, तुझी मानसिकता खूप बदललीय रे. मी तुला वारंवार म्हणायची, तुझी मानसिकता बदललीय रे.. तर तू पटकन म्हणतोस,' नाही तुझा दृष्टिकोण बदललाय.' मला माहित आहे तू खूप बुद्धिमान आहेस, चतुर आहेस. पण एक सांगावसं वाटतं, सदैव बुद्धीचाच वापर करू नये माणसाने. कधीतरी मनाचा, -हदयाचा,भावनांचाही विचार करावा तु. अरे, कधी तू माझ्या मताचा राहू दे निदान मनाचा तरी विचार केलाय कधी..? अरे एका पत्नीच्या मनाची स्पंदने पत्नीला नाही ओळखता येत यापेक्षा आणखी काय दुर्दैव असेल माझं..? एके दिवशी तर तू रागानं म्हटला होतास, 'बस्स झालं, तुझ तोंड बंद कर. कंटाळा आलाय तुझ्या या फिलॉसॉफीचा.' अंधाऱ्या गर्तेत चालणारं तुझं वाक्य किती सलतय मला याचा तुला अंदाज असेल असं वाटत नाही.आतल्या आत खूप गुदमरते रे मी…. पण खरंच तुला मनापासून सांगतेय मी, तुझ्यावर खूप प्रेम करतेय मी.तु जेव्हा मी चुकते तेव्हा रागवतो ना तेव्हा तुझा राग येत नाही पण कारणाशिवाय रागावतो ना अन् ते ही असल्या फटकळ शब्दात टाकून दिल्यासारखे बोलतो ना तेव्हा मात्र मी अक्षरशः तडपडते रे... अक्षरशः तडफडते..अन् मी हे कुणापाशीही सांगू शकत नाही. इच्छा सांगायची,मोकळं व्हायची खूप असते. पण वरून तुझी काळजी. आपल्या संसाराची. अशा गोष्टी माझ्या स्वभावाच्या विरूद्ध जाऊन दाबून ठेवते फक्त तुझ्यासाठीच ना…?
तुला माहित आहे मला पुस्तक वाचण्याची किती आवड आहे. तुला कितीवेळा सांगितलं मी पुस्तककांशिवाय नाही राहु शकत. पुस्तकांच्या प्रदेशात रमायला खूप आवडते तुला कसं सांगु ..? वाचनाशिवाय जीव गुदमरतो रे माझा.न वाचता दिवसभर माझं मन कशातच लागत नाही. खरं सांगते, प्रत्यक्ष जीवनातील पात्रांपेक्षा पुस्तकातीलच पात्रे जास्त भावतात मला.कारण प्रत्यक्ष जीवनातील पात्राकडून बराच त्रास झालाय मला. मी पुस्तकातील पात्रांनी इतकी तादात्म्य पावते मी स्वतःला विसरते. खूप मज्जा येते. अवर्णनीय आनंद मिळतो. का कोण जाणे तुला माझ्या या छंदाचं, आवडीचं काहीच वाटत नाही. तुझ्यामध्ये आलेली व्यावसायिकता कधीकधी मला घरातही दिसते. खूप वाईट वाटतं. दिवसेंदिवस तुझ्यामधील कमी होत चाललेली संवेदनशीलता अस्वस्थ करते मला. तू असा नव्हतास. तुझ्यातील हा बदल मला खूप आतपर्यंत अस्वस्थ करतो. 'माणसाने कुठे 'प्रोफेशनल' आणि कुठे 'इमोशनल' रहायचं' या तुझ्या आवडत्या वाक्यावर तूच आत्मपरीक्षण करावं. एकेकाळी माझ्या वाचनाच्या आवडीपायी किंबहुना माझ्या वाचनप्रेमावर भाळणारा तू आणि आजचा तू विश्वासच बसत नाही मला. मला माहित आहे तुला हे पत्र वाचून खूप दुःख होईल. पण मला हे सांगण्याचा खूप त्रास होतोय पण तरीसुद्धा मनावरती दगड ठेवून आणि अश्रुधारांच्या साक्षीने मी हे लिहित आहे प्लीज मला समजून घे.
पण खरं सांगतेय, काही सुचत नाही. ज्याच्या नुसत्या अस्तित्वाने मला भरून येतं, ज्याच्या -हदयाची स्पंदने स्पंदित होतात -हदयात माझ्या.ज्याला समर्पित करावीत अशी कोटी कोटी आयुष्ये…. ज्याच्या सहवासाने, सानिध्याने अंतर्बाह्य उजळून निघते मी ….ज्याचा आवाज ऐकण्यासाठी आतूर असतात माझे कान, जो नेहमी नसानसात असतो आणि श्वासाश्वासात जाणवतो….. ज्याच्या कुशीत गेल्यावर जगाचाच काय स्वतःचाही विसर पडावा असा तू माझ्यासाठी कोण आहेस हे सांगणं शब्दात मावणारं नाही….!
मला वाटतं माझा 'रोबोट' करण्याअगोदर तु विचार करावा. तुझ्यासाठी पैसा, संपत्ती, वस्तू महत्वाच्या असतील पण माझ्यासाठी नाही. माझे सुख वस्तूंमध्ये नाही. विचार कर. मला माहित आहे. तू खूप चांगला आहेस. तुला मी खूप चांगले ओळखते. पण तू माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकावास. संसार दोघांचा असतो. संसार रुपी रथाची चाके आहोत आपण.खूप स्वप्ने बघितली आहेत आपण. खरं म्हणजे मलाही सतत वाटायचं तुझ्याशी बोलावं या विषयावर. पण तुला त्रास होईल म्हणून मी कुढत राहिले आजवर.आतल्या आत. तुला माहित नाही आतल्या आत भावनांना दाबण्यांनं होणारी घुसमट..
खरंच सांगतेय, तु खूप खूप दूर गेलाय माझ्यापासून... सतत सोबत असूनसुद्धा. माझं विश्व प्लीज तू जाणून घे.सगळ्या सुखवस्तू घरी लोळत असताना देखील मी सुखापासून दूर का?अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ मनात घोंघावया लागलय.बरंच काही मिळवूनही बरंच काही हरवत चालल्याची भावना जोर धरू लागलीय एवढं मात्र खरं….! तुझ्या जवळ असेन मी आयुष्यभर पण तरीही तुझ्यापासून कितीतरी दूर.एका सुदूर वाळवंटात एका ओॲसिसच्या शोधात...एकटीच.. अगदी एकटी….!
तुझ्या अन् तुझ्या उत्तराच्या प्रतीक्षेत…!!(नेहमीप्रमाणे..)
तुझीच,
सुमन
सुमन हे पत्राला पूर्णविराम दिला आणि विचारचक्रांच्या वादळांशी सामना करत बसली एकटीच...अगदी एकटीच…!